Thursday, May 16, 2019

मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव:

#मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव:
*लष्करी अळीची ओळख आणि जीवनक्रम* :
- किडीचा पतंग करड्या रंगाचा असतो. मादी पतंग मक्याच्या पोंग्यात कोवळ्या पानांवर वरच्या बाजूने पुंजक्यात अंडी घालते. मादीचा सर्वसाधारण काळ १० दिवसाचा असतो. एक मादी सरासरी १२००-१८०० अंडी घालते.
- प्रथम अवस्थेतील अळी अंड्यातून बाहेर आल्यानंतर कोवळ्या पानावर उपजीविका करते. ही अवस्था साधारणपणे १४ ते २१ दिवसाची असते.
- वाढीच्या टप्प्यात अळीचा अंगावरील गडद ठिपके स्पष्ट दिसून येतात. तसेच डोक्यावर Y हे इंग्रजी अक्षर पांढऱ्या रंगात उलटा स्पष्ट दिसतो. ही अवस्था ३ ते ४ दिवसाची असते. नंतर अळी कोषावस्थेत जाण्यासाठी  जमिनीत शिरते.
*नुकसानीचा प्रकार:*
- ही किड मका पिकाचे पान खाऊन नुकसान करते. प्रथम अवस्थेत अळी कोवळ्या पानांवर उपजीविका करते. एका बाजूने खरडून खाल्ल्यामुळे पानावर पांढरे ठिपके दिसून येतात.
- दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत पानाला छिद्रे पाडून पानाच्या कडेपासून शिरेकडे पाने खायला सुरुवात करतात.
- पोंग्यामध्ये असताना लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास पान उघडल्यानंतर एकाच रेषेत गोल छिद्रे दिसून येतात. पूर्ण वाढ झालेल्या अळी अधाशीपणे झाडाची पाने खाऊन फक्त शिराच ठेवतात.
- मका पिकात सुरुवातीच्या काळात पोंग्यामध्ये प्रादुर्भाव कमी दिसतो
*एकात्मिक व्यवस्थापन*:
- मका पिकामध्ये शेतातील काडीकचरा, धसकटे वेचून नष्ट करावी, कारण त्यामध्येच ही अळी सुप्तावस्थेत राहते.
- पोंगे मर दिसताच मक्याची झाडे काढून नष्ट करावीत.
- किडीचा पतंगाला आकर्षित करून मारण्यासाठी एकरी एका प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
- लागवडीनंतर २० दिवसांनी फोरेटचे (१० टक्के) ५ ते ६ दाणे पोंग्यात टाकावे.
*रासायनिक नियंत्रण*:
- अळीच्या वाढीच्या पहिल्या अवस्थेमध्ये थायमेथोक्झाम १२.६ + लॅम्बडा सायहेलोथ्रीन ९.५ झेड सी% (अलिका १५ मिली)
- प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास (डायक्लोरोव्हास ७६% इ सी  + स्पिनोसॅड ४५% एस सी(नुवान २० मिली + ट्रेसर ७ मिली))
किंवा डेल्टामीथ्रीन ११% इ सी (डेसीस १५ मिली) आलटून पालटून ८ ते १० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
- भुसा १० किलो + गूळ २ किलो एकत्र करून गोळे तयार करावे. त्यामध्ये थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी (लार्विन) १०० ग्रॅम मिसळून लहान गोळे तयार करून मक्याच्या पोंग्यात टाकावे.
@swikrutiagro

No comments:

Post a Comment